Sunday, June 13, 2021

तोडांत खर्रा (गुटखा) आणि हातात भगवे-निळे झेंडे आणि जयघोष!!

       १९ फेब्रुवारी म्हणजेच आपल्या महाराष्ट्राचेच आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या दिवसाची महती सांगावी तेवढी कमी. हाच तोच सुवर्ण दिन आहे ज्या दिवशी महाराष्ट्राचे कैवारी शिवनेरीच्या पावन धर्तीवर जन्माला आले. आणि त्यांनी आपल्या जिवाभावाच्या माणसांना सोबत घेऊन रक्ताचे पाणी करुन या स्वराज्याची स्थापना केली. यासाठी कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देत त्याची प्राणज्योत विझवून या महाराष्ट्राची धगधगती मशाल पेटविली. आणि येथील भूमी सुजलाम सुफलाम केली.
     आपल्या राजाची जयंती न जाणे कित्येक शिवप्रेमी मोठ्या धुमधडाक्यात साजरी करतात. आणि हे चित्र पाहून खूप जास्त हायस होत आणि तेवढीच ऊर्जा मिळते. याच प्रकारे आज आम्ही ही शिवजयंती साजरी करण्याच्या उद्देशाने काही तरी आगळावेगळा कार्यक्रम घेण्याचा मानस घेऊन बाहेर पडलो. रस्तावरील असंख्य बाईक रँली पाहून पूर्ण रस्ते दणाणून निघत होते आणि या कडे आम्ही सर्व मोठ्या गर्वाने बघत होतो. आणि तेवढ्यात एका युवकावर नजर पडली. अत्यंत रुबाबदार व्यक्तिमत्व त्यात महाराजांसारखी दाढी आणि डोक्यावर चंद्राची कोर साजेशी दिसत होती आणि हातात भगवा झेंडा घेऊन त्याच्यातच खरा शिवभक्त दिसत होता. पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की त्यांच्याकडे जी उत्साहवर्धक नजर होती ती अचानक रागात परिवर्तित झाली. तो युवक आपल्या गाडीवरुन ज्या उत्साहाने महाराजांच्या नावाचा जयघोष करीत होता त्याच गाडीवरुन खर्याच्या पिचकाऱ्या त्या रस्त्यावर मारत होता.
          अचानक असंख्य प्रश्नाचा गोंधळ डोक्यात उडाला. म्हणजे ज्या महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या जिवाचे रान करुन हे स्वराज्य निर्माण केले ते याच नालायक युवकांसाठी केले असेल का? महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक मंडळ मोठमोठ्या शोभायात्रा आयोजित करतात पण यामध्ये काही युवक दारु पिऊन तसेच गुटखा खाऊन सहभाग घेतात आणि नंतर रस्ताने मोठ्या प्रमाणावर गाडीने ध्वनि प्रदूषण करुन आपला आसुरी आनंद प्रदर्शित करतात. आणि काही युवक बेधुंद होऊन डि.जे च्या कर्णकर्कश आवाजात दारु पिऊन धिंगाणा घालतात.
              खरंच आज अश्या युवकांना महाराजांचे विचार समजायची नितांत गरज भासत आहे. स्त्रीचा आदर, स्वच्छता, समानतेची वागणूक, मोठ्यांचा आदर या सर्व गोष्टी महाराज आपल्याला शिकवून गेले आहे. आणि आज तीच शिकवण शिकायची वेळ आली आहे.
           कुठल्याही व्यक्तीला जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्याला त्याच्या चरित्र्याला जाणून घेणं गरजेचे असते. कारण व्यक्ति हा मरण पावतो पण तो सर्वांच्या आठवणीत राहतो त्याच्या कर्मामुळे आणि चारित्र्यामुळे.  श्री छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला त्यांच्या चारित्र्यापासून असंख्य अश्या गोष्टी शिकवून गेले. कैदेतील शत्रूच्या पत्नीचाही मानसन्मान करुन तिच्या अब्रुला धक्काही न लागु देता तिला साडी चोळीचा आहेर करुन तिला परत पाठविले होते. एवढा प्रचंड स्त्री जातीचा सन्मान होता पण आजची परिस्थिती पाहता खरंच मन तुटून येत आहे. ५ वर्षाच्या मुलीपासून ते ८० वर्षांच्या वृद्ध स्त्रीलासुद्धा आपल्या संरक्षणासाठी धडपडावं लागत आहे. 
            महाराजांनी आपल्या रयतेसोबत कधीच भेदभाव होऊ दिला नाही. पण आज ती परिस्थिती नाही राहिली काही मोजक्या राजकारणी लोकांनी आपल्या राजनैतिक फायद्यासाठी कधी या भुमीत जाती आणि धर्माच बिज पेरल हे कळलंच नाही आणि समाजाचा पार बट्याबोळ करुन टाकला. प्रत्येकाला एका विशिष्ट जाती आणि धर्माच्या नावाखाली बांधून ठेवण्यात आले आहे. आणि याच भानगडीत आजच्या युवकांना माणुसकीचा कुठेतरी पार विसर पडत आहे.
         आज खरंच युवकांनी शिवचरित्र वाचायची गरज आहे. जर याचप्रमाणे स्त्रियांचा अनादर होत राहिला याचप्रमाणे युवक आपल्या जबाबदाऱ्या सोडून चूकीच्या मार्गाने जात राहिला तर "राजे पुन्हा जन्माला या" हे वाक्य म्हणायची हिम्मतही होणार नाही.

त्या खर्रा (गुटखा) ची पिचकारी मारणाऱ्या युवकास समर्पित...

सुरज गजानन जामठे
संस्थापक अध्यक्ष ९७६६२५७०६७
लिगल स्क्वेअर मल्टिपर्पज असोसिएशन अमरावती.

No comments:

Post a Comment

तुम्हाला सुद्धा एका सुंदर मुलीचा विडिओ काँल येऊ शकतो, पण सावधान!!

      एक दिवस आपण नेहमी प्रमाणे आपले Whatsapp उघडतो. आणि अचानक एका नवीन नंबर वरून मेसेज आलेला दिसतो. वाँट्सप नंबर च्या डिपी वर एका सुंदर मुल...